'हृदयस्पर्शी नाना'
सत्यभाषा विशेष - विशेष लेख
विश्लेषण :- विवेक देशपांडे
दि. 8/10/2026 रोजी गुरुवारी सकाळी सकाळी एक दुःखद बातमी कानावर आली. मन विषण्ण झाले. बातमी अशी की, सुप्रसिद्ध अभिनेते, जनसामान्यांचे कैवारी, मराठमोळा माणूस नाना पाटेकर यांच्या दुःखद निधनाची. एक दिवसापूर्वीच नाना म्हणाले होते "उद्या मी असेन की नाही?" आणि ते खरोखरच आम्हाला रडवून गेले.
रंगभूमीवरून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या नानांनी 'गमन' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 'परिंदा' (१९८९) आणि 'क्रांतिवीर' (१९९४) या चित्रपटांतील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. 'अग्निसाक्षी', 'खामोशी:द म्युझिकल', 'अब तक छप्पन', 'अपहरण', 'राजनीती', 'वेलकम', 'नटसम्राट' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी अभिनयाची विविध रूपे साकारली.
'वेलकम' मधील उदय शेट्टी ही व्यक्तिरेखा त्यांच्या विनोदी अभिनयाची वेगळी बाजू दर्शवीणारी ठरली. 'नटसम्राट' मधील निवृत्त रंगभूमी अभिनेत्याची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम भूमिकांपैकी एक मानली जाते. 'प्रहार: द फायनल अटॅक' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले.
नाना पाटेकर हा केवळ अभिनेता नव्हता तर तो चांगला मित्र, समाजभान असलेला व्यक्ती होता आणि मिश्किल माणूसही होता. त्यांच्याबद्दल कोणाच्याही मनात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता अधिक असायची, ज्यांनी गैरसमज करून घेतले नाहीत, त्यांना नाना 'ग्रेट' वाटला. पण नानाने त्याची कधीही पर्वा केली नाही अगदी मराठमोळ्या माणसाप्रमाणे. नानांसारखा स्पष्टवक्ता मी आजवर पाहिला नाही. कोणाचीही तमा न बाळगता अगदी परखडपणे स्पष्ट मत देणे हे त्यांचे वैशिष्ट्य, त्यांचा स्वभाव कधी बदलला नाही. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी नानांबद्दल सांगतात की, नानांचे कोणाशी मतभेद असले, अगदी भांडण झाले तरी त्याचा राग मनात धरून ठेवत नसत. 'पाहिजे जातीचे ' प्रयोगावेळेस नाना आपल्या स्वभावानुसार एका व्यक्तीला स्पष्टपणे बोलले.
एका ज्येष्ठ व्यक्तीला तो बोलला, त्यामुळे रोहिणी ताईंना त्याचा राग आला होता पण नंतर हे दोघे एकमेकांशी मस्करी करताना दिसले. यावर रोहिणीताई म्हणतात नानांची ती त्यावेळीची प्रतिक्रिया होती, यालाच म्हणतात मराठमोळा स्वभाव, जिथचे तिथे सोडून देणे.
नानांचे जाणे ही अपरिमित हानी आहे. मकरंद अनासपुरेसोबत नानांनी 'नाम' सारखी संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी फार मोठे काम केले आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, याचे भान त्यांना होते.
रुपेरी पडद्यावर अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे नाना प्रत्यक्ष आयुष्यातही शेतकऱ्यांच्या वेदनेने अस्वस्थ झाले. दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या वाचून थांबण्यापेक्षा त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा रस्ता धरला. तिथे कॅमेरे नव्हते, पुरस्कारांची झगमग नव्हती होती ती पती गमावलेल्या महिलांची हतबलता, मुलांच्या डोळ्यातील प्रश्न आणि पाण्यासाठी आकाशाकडे लागलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा.सप्टेंबर २०१५ मध्ये 'नाम फाऊंडेशन'ची सुरुवात केली. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना तातडीची मदत करण्यापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे पाणी संवर्धन, जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन, शेती व ग्रामीण विकासाच्या व्यापक कामात बदलला.
१९९९ च्या कारगील युद्धामध्ये आपल्या अभिनयातून ब्रेक घेऊन युद्धभूमीवर प्रत्यक्ष सेवा दिली. तत्कालीन संरक्षण मंत्री जार्ज फर्नांडिस यांची परवानगी घेऊन ते भारतीय सैन्यात 'मानद कॅप्टन' म्हणून रूजू झाले. द्रास, कुपवाडा, आणि एलओसीवर गस्त घालण्यासोबतच त्यांनी जखमी सैनिकांना सेवा दिली. या कठीण काळात त्यांचे तब्बल २० किलो वजन कमी झाले होते. त्यांची नियुक्ती युद्धातील अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात झाली होती. ते 'क्विक रिॲक्शन टीम' चे सदस्य होते. यावेळी ६० दिवस ते युद्धभूमीवर होते.
नानांनी स्वतःचे कारकिर्दीबरोबर कुटुंबालाही प्राधान्य दिले, नीलकांती या त्यांच्या धर्मपत्नी, या सुखा-दुःखात सोबत राहिल्या. नीलकांती बँकेत अधिकारी होत्या, तसेच त्या अभिनेत्रीही होत्या.
त्यांनी चित्रपट व रंगभूमीवर काम केलं. अभिनयासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. विशेषतः मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली, कुटुंब व मुलांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. याच काळात नानांचे करिअर वेगाने पुढे जात होते, घरातील जबाबदाऱ्या नीलकांती यांच्या खांद्यावर होत्या. नानांनीच एक गोष्ट त्यांच्या मुलाखतीत सांगितली आहे की नीलकांती, त्यांचा मुलगा मल्हार आणि नानांची आई एकत्र राहत होते व नाना मात्र वेगळे राहत होते.
नाना आणि त्यांची पत्नी वेगवेगळे राहू लागले, पण त्यांचा घटस्फोट झाला नव्हता. स्वतः नानांनीच या नात्याबद्दल बोलताना एकदा सांगितले होते की, अनेक वर्षे आनंदाने एकत्र राहिल्यानंतर दोघांमध्ये काही मतभेद निर्माण झाले आणि हळूहळू ते वेगळे झाले. मात्र वैवाहिक नाते कायम राहीले. ही गोष्ट नानांच्या आयुष्याचा कदाचित सर्वात कमी चर्चीला गेलेला भाग असावा. कारण एखादं नातं तुटलं म्हणजे संपलं असं त्यांच्या बाबतीत झालं नाही. दोघांनी वेगवेगळं आयुष्य स्वीकारलं मात्र परस्परांवियषयीचा आदरभाव आणि कृतज्ञता नानांच्या बोलण्यात कायम दिसत राहिली.
नाना अभिनेत्यासोबतच उत्तम शेतकरी होते. सिंहगडजवळ 'डोंणजे' या गावी नानांचे २५ एकरात पसरलेले 'फार्म हाऊस' आहे. तांदूळ, गहू, कांदे, लसूण अशी पिके ते घ्यायचे. गाई बैल यांना ते मित्र मानत. ते उत्तम श्वाननप्रेमी होते, अनेक झाडेही त्यांनी तिथे लावली होती. येथेच गणपती उत्सव साजरा करायचे. या उत्सवासाठी ते एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले होते, "मी तुला मुख्यमंत्री म्हणून बोलवलं नाही आहे, माझा मित्र म्हणून बोलवत आहे."
असा मैत्री जपणारा, मैत्रीला जागणारा नाना एकच. नानांच्या आणि देवेंद्रजींच्या मैत्रीचा एक किस्सा असाही सांगितला जातो की नाना, देवेंद्रजींना म्हणाले होते की मला तू मुख्यमंत्र्यापेक्षा विरोधी पक्षनेता म्हणून जास्त आवडतोस , किती छान मुद्दे मांडतोस, फक्त खूप मोठ्याने बोलू नकोस रे बाबा किती ओरडशील. आणि देवेंद्रजींनी ते ऐकलेही.
असा हरहुन्नरी कलाकार, संवेदनशील माणूस, आभाळ फाटलं तरी हरायचं नाही असा ठाम विश्वास देणारा, निसर्गप्रेमी, मराठमोळी जरब ठेवणारा, नटसम्राट, हृदयस्पर्शी काळाच्या पडद्याआड गेला. नाना, तुला आणि तुझ्या कर्तुत्वाला गवसणी घालण्याचे अवघड काम मज पामराचे नाही, माझी शब्दसंपदा संपली पण तुला अंशतः गवसणी घालण्याचा प्रयत्न केला. तुला भावपूर्ण श्रध्दांजली. शक्य असल्यास पुन्हा ये असाच मराठमोळा बनून. तुला आमचा मानाचा मुजरा!
विवेक मुकुंदराव देशपांडे
मो. नं. ९४२२८६९५०३
वणी, ता. वणी, जि. यवतमाळ.









0 Comments