ADvt

उकणी वेकोली खुल्या खाणीत भीषण भूस्खलन



उकणी वेकोली खुल्या खाणीत भीषण भूस्खलन; दोन डंपर मातीखाली...

चालकांची प्रसंगावधानाने थरारक सुटका; वेकोलीच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह...

वणी : - सुरज चाटे

     वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (वेकोली) उकणी खुल्या कोळसा खाणीत गुरुवारी दि. ८ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास भीषण भूस्खलनाची घटना घडली. गाळयुक्त मातीचा प्रचंड लोंढा अचानक कोसळल्याने कामावर असलेले दोन डंपर पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. सुदैवाने दोन्ही चालकांनी प्रसंगावधान राखत वेळेत डंपरमधून बाहेर पडून स्वतःचा जीव वाचविल्याने मोठी जीवितहानी टळली.
     मिळालेल्या माहितीनुसार, उकणी खुल्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणावर यंत्र सामग्रीच्या सहाय्याने मातीचे उत्खनन करून कोळसा काढण्याचे काम सुरू असते. जवळपास १०० मीटरपर्यंत माती हटविल्यानंतर कोळशाचा थर गाठला जातो. या प्रक्रियेमुळे खाण परिसरात खोल खड्डे निर्माण झाले आहेत.


     पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने ते पंपाद्वारे बाहेर काढून खाणीच्या वर तयार करण्यात आलेल्या शिल्ड (तलाव) मध्ये साठविले जाते. गुरुवारी याच पाण्याखालील कोळसा काढण्याचे काम सुरू असताना अचानक शिल्डला लावलेली पार सरकल्याने गाळयुक्त पाणी आणि मातीचा प्रचंड लोंढा खाणीत कोसळला.


     या अचानक झालेल्या भूस्खलनामुळे खाली काम सुरू असलेले दोन डंपर क्षणार्धात मातीखाली गेले. घटनेनंतर खाण परिसरात एकच खळबळ उडाली. दोन्ही चालकांनी जीवाच्या आकांताने डंपरमधून बाहेर पडत इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरक्षितस्थळी धाव घेतली. या घटनेमुळे वेकोली प्रशासनाच्या सुरक्षा उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून खाण परिसरातील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments