गद्दार वणीत दिसले तर कपडे फाडू, थापडा मारू.....
शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांचा इशारा; वणीतील पत्रकार परिषदेत खळबळजनक वक्तव्य, राजकीय वातावरण तापले...
वणी : - सुरज चाटे
जनतेच्या विविध प्रश्नांवर १ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची पत्रकार परिषद आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात व मुख्य उपस्थितीत मंगळवारी दि.१७ ला सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान वणी येथील वसंत जीनिंग सभागृहात पार पडली. मात्र यात जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी केलेल्या आक्रमक वक्तव्याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान "ऑपरेशन टायगर" संदर्भात पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता निखाडे यांनी थेट इशाराच देत, "गद्दार जर वणीत आले किंवा आम्हाला परिसरात दिसले तर त्यांचे कपडे फाडू आणि थापडा मारू. ज्यांची राजकीय कारकीर्द संपली होती, त्यांना शिवसेना (उबाठा) ने आसरा दिला. मात्र आता तेच गद्दारी करत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही," असे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली. आगामी निवडणुका आणि बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
यावेळी आमदार संजय देरकर तथा संजय निखाडे यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, महिला, बेरोजगार युवक, पाणीटंचाई, कोळसा प्रदूषण, रोजगार, रस्ते, रेल्वे सायडिंग आणि वाढत्या गुन्हेगारीसह विविध जनहिताच्या प्रश्नांवर शासनावर जोरदार टीका केली. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत १ जुलै रोजीचा जनआक्रोश मोर्चा हा जनतेच्या असंतोषाचा उद्रेक ठरेल, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, निखाडे यांच्या आक्रमक भाषेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या वक्तव्यावर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
जनआक्रोश मोर्चाची घोषणा....
शिवसेना (उबाठा) च्या वतीने १ जुलै रोजी वणी येथे भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून शेतकरी, महिला, युवक, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी आमदार संजय देरकर यांच्याकडून करण्यात आले.







0 Comments