देशी पिस्तूलसह संशयिताला बेड्या..
शिरपूर पोलिसांची धडक कारवाई; ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त, दोन जिवंत काडतुसेही हस्तगत...
वणी :- सुरज चाटे
अवैध शस्त्रास्त्रांवर पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा प्रहार करत गावठी बनावटीचे देशी पिस्तूल बाळगणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. शिरपूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली असून आरोपीकडून एक देशी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घुगुस येथील खुक्यात आरोपी शाहरुख उर्फ पावडा यांच्याकडून सदर गावठी पिस्तल जप्त करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ आणि इतर गुन्हेगारी कारवायां विरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याच अनुषंगाने शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष मनवर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी १३ जून रोजी रात्री कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख गुलझार खान (३१) रा. आयटीआय वॉर्ड क्रमांक २, घुग्घुस, ता. जि. चंद्रपूर) हा इसम मुंगोली परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मुंगोली परिसरात शोधमोहीम राबवून संशयिताला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे गावठी देशी पिस्तूल तसेच दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ शस्त्र व काडतुसे जप्त करून आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियमाच्या कलम ३/२५ सह भारतीय न्याय संहितेच्या कलम १३५ व १२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गुप्त माहिती ठरली निर्णायक....
अवैध शस्त्रास्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी उभारलेल्या माहितीदारांच्या जाळ्यामुळे ही कारवाई शक्य झाल्याचे सांगितले जात आहे. वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे संभाव्य गुन्हा रोखण्यात पोलिसांना यश आले.
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी...
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर पोलिस स्टेशन चे ठाणेदार संतोष मनवर यांच्या सह त्यांच्या टीम कडून करण्यात आली. या मोहिमेत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने सक्रिय सहभाग घेत आरोपीला जेरबंद केले.
जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्रांविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र होत असून, अशा कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.







0 Comments