जे माझे सोबत झाले ते...इतरांसह होऊ नये..करीता त्या महसुल अधिकाऱ्यावर कडक शासन होणे गरजेचे..... सुरज चाटे
दोषी अधिकारी व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी; अंदाज समिती अध्यक्ष तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना सुरज चाटे यांचे निवेदन...
त्या बचाव पत्राने FIR घेण्यास झाला होता विलंब.....कारवाई न करण्याचे SDO चे ते बचाव पत्र कशापाई....
सत्यभाषा वणी :- वडगाव (धं) येथील बनावट सातबारा, बोगस फेरफार व खोट्या कागदपत्रांच्या आधारे भूखंड विक्री करून फसवणूक केल्याच्या चर्चेत असलेल्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासोबतच संबंधित महसूल अधिकाऱ्यांची भूमिका तपासून, दोषींना सेवेतून कायमस्वरूपी मुक्त करण्याची मागणी पत्रकार सुरज चाटे यांनी अंदाज समिती अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रकरणात सतीश केराम व शैलेश वाकडे यांच्यावर कारवाई होऊन त्यांना न्यायालयीन कोठडीची प्रक्रिया पार पडली, तर महसूल विभागातील तलाठी रवींद्र उपरे व मंडळ अधिकारी राजू डोंगरे यांच्या बाबतही न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना न्यायालयाकडून अटी-शर्तींच्या अधीन राहून जामीन मिळाला आहे.
मौजा वडगाव (धं) येथील संबंधित भूखंड शैलेश वाकडे यांच्या मालकीचा असल्याचे भासवून फिर्यादींना सातबारा, फेरफार उतारा व नकाशासह विविध कागदपत्रे दाखविण्यात आली. या कागदपत्रांच्या आधारे व्यवहार करण्यात आला. संबंधित कागदपत्रे खरी असल्याचे भासवल्याने फिर्यादींकडून तब्बल १ लाख २० हजार रुपयांचा व्यवहार झाला. मात्र त्यानंतर संबंधित भूखंड प्रत्यक्षात दुसऱ्याच व्यक्तीच्या मालकीचा असल्याचे निदर्शनास आल्याने संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
बनावट कागदपत्रांच्या आधारे महसूल अभिलेखात फेरफार होणे ही गंभीर बाब असून, भविष्यात अशा प्रकारची फसवणूक कोणत्याही नागरिकासोबत होऊ नये, यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सुरज चाटे यांनी केली आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी संबंधित कागदपत्रांची आवश्यक ती शहानिशा केली होती का?, फेरफार करण्यापूर्वी अभिलेखांची पडताळणी करण्यात आली होती का?, हे सर्व प्रक्रिया केली असती तर ही वेळ आली नसती. तसेच या प्रक्रियेत अन्य कोणाची भूमिका होती, शासकीय दस्तावर विश्वास ठेवायचा की नाही?..त्या बचाव पत्राने FIR घेण्यास झाला होता विलंब.....कारवाई न करण्याचे SDO चे ते बचाव पत्र कशापाई? हे मात्र कळेनासे झाले आहे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करत त्यांना कायमस्वरुपी सेवा मुक्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह...
या प्रकरणामुळे महसूल अभिलेखातील सातबारा व फेरफार नोंदींच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन व्यवहार होत असल्यास त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास होणे आवश्यक असल्याची मागणीही करण्यात आली आहे.
दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सुरज चाटे यांनी अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी आणि महसूल अभिलेखांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात तथा होणारे गैरव्यवहार थांबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.








0 Comments