गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशपर्यंत शोधमोहीम; शिरपूर पोलिसांनी उघडकीस आणली घरफोडीची मोठी टोळी....
पांढरकवडा येथील 97.50 लाखांच्या घरफोडीचा छडा; 60.10 लाखांचा मुद्देमाल, गुन्ह्यातील चारचाकी वाहन व आरोपी पोलिसांच्या ताब्यात...
वणी : - सुरज चाटे
पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहदा येथे झालेल्या तब्बल 97 लाख 50 हजार रुपयांच्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात शिरपूर पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत 60 लाख 10 हजार 802 रुपयांचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन तसेच चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 जुलै 2026 रोजी पहाटे मोहदा येथील वर्मा ज्वेलर्स या दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 97.50 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यापूर्वी 14 जुलै रोजी मोहदा-मेटीखेडा मार्गावर एका नागरिकालाही लुटून 44 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. या दोन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंथा व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलिसांचे विशेष तपास पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि विविध राज्यांतील शोधमोहीम राबवत आरोपींचा माग काढण्यात आला. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि पुणे परिसरात तपास करून अखेर आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले.
आरोपींकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा 60 लाख 10 हजार 802 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही उल्लेखनीय कारवाई शिरपूर पोलीस स्टेशनचे सपोनि संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ इकबाल शेख, प्रशांत झोडे, पंकज कुडमेथे, प्रफुल्ल नाईक आदी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या धडाकेबाज कारवाईमुळे पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.







0 Comments