ADvt

अवघ्या २४ तासांत WCL सुरक्षा रक्षकाच्या खुनाचा छडा...


अवघ्या २४ तासांत WCL सुरक्षा रक्षकाच्या खुनाचा छडा...

तक्रार देण्याच्या वादातून झाली सुरक्षा रक्षकाची हत्या..

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची धडाकेबाज कारवाई :-  आरोपी अंचल उईके पोलिसांच्या ताब्यात

वणी : - सुरज चाटे 

     शहरातील कोलारपिंपरी परिसरातील प्रगती नगर कॉलनी येथे WCL क्षेत्रीय प्रबंधक कार्यालयात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या निर्घृण हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत छडा लावत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.
      मृतक ओमप्रकाश हिरा प्रसाद (वय ४५) हे कोलारपिंपरी येथील प्रगती नगर कॉलनी परिसरातील WCL क्षेत्रीय प्रबंधक कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री कार्यालयाच्या परिसरात अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर, कपाळावर व चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाचे वार करून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ११५९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
     या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंचल मोहन उईके (वय २८, रा. प्रगती नगर कॉलनी, कोलारपिंपरी, वणी) हा घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शोधमोहीम राबवून दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले.

तक्रार नोंदविण्यावरून वाद, अन् हत्येची घटना...
     पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत प्राथमिक माहितीनुसार, ३१ ऑक्टोबरच्या रात्री कॉलनी परिसरात रानडुकरांचा कळप आल्याने मोटारसायकलवरून पडल्याच्या कारणावरून संबंधित कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी अंचल उईके गेला होता. रात्री १०.४० वाजताच्या सुमारास कार्यालयात उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षक ओमप्रकाश प्रसाद यांच्याकडे त्याने तक्रार देण्याबाबत विचारणा केली. मात्र, सुरक्षा रक्षकाने सकाळी कार्यालयात येण्यास सांगितल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादातून संतप्त झालेल्या आरोपीने सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर, कपाळावर व चेहऱ्यावर वार करून त्यांची हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
     या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस ठाण्याकडून सुरू असून, हत्येमागील सर्व बाबींचा तपास केला जात आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची यशस्वी कामगिरी....
     ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
     या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, गजानन राजमलु, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, शिवशंकर कायंदे, सागर इंगळे यांच्यासह पोलीस अंमलदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, सोहेल मिर्झा, मिथुन जाधव, योगेश डगवार, रुपेश पाली, किशोर आडे, मिलिंद दरेकर, सचिन मलाये, महेश वाकोडे, रजनीकांत मडावी, सलमान शेख, दिगंबर पिलावन, पवन ढवळे, आकाश सूर्यवंशी, नरेश राऊत, जितेंद्र चौधरी व सुनील मेश्राम यांचा सहभाग होता.
    अवघ्या २४ तासांत आरोपीला ताब्यात घेऊन खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाची प्रभावी कामगिरी अधोरेखित झाली आहे.

Post a Comment

0 Comments