श्रीकृष्णाच्या जयघोषात वणी दुमदुमली...
जन्माष्टमीनिमित्त भव्य भक्तिमय शोभायात्रा; हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग...
वणी : - सुरज चाटे
श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती, वणीच्या पुढाकाराने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातून भव्य भक्तिमय शोभायात्रा काढण्यात आली. ‘जय श्रीकृष्ण’च्या जयघोषाने संपूर्ण वणी शहर दुमदुमून गेले. अमृत भवन येथून प्रारंभ झालेली शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली.
शोभायात्रेतील वारकरी व पदावली भजन मंडळांची भक्तिगीते, विविध देवी-देवतांच्या आकर्षक झांक्या, असुरांची झांकी, अघोरी तांडव नृत्य, नंदीवर स्वार भगवान शंकर-पार्वती, महाकाय वीर बजरंगबली, गोरिला, गोंडी ढेमसा नृत्य आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा ही प्रमुख आकर्षणे ठरली. त्यासोबतच ढोल-ताशांचा गजर, धुमाळ बँड आणि डीजे लायटिंगच्या नेत्रदीपक रोषणाईने शोभायात्रेची रंगत आणखी वाढली.
पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या भाविकांनी ‘जय श्रीकृष्ण’चा जयघोष करत भक्तिमय वातावरण निर्माण केले. शोभायात्रा शहरातील विविध मार्गांवरून जात असताना ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वणी शहराला जणू भक्तीमय यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालगोपालांसह वणी शहर व परिसरातील हजारो भाविकांनी शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भाविकांच्या सेवेसाठी समितीच्या वतीने फराळ व थंडपेयाचे वाटप करण्यात आले.
श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. कुणाल चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. विजयबाबू चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.











0 Comments