ADvt

एका क्षणात संसार उद्ध्वस्त... काळाने हिरावली पती-पत्नीची साथ...



एका क्षणात संसार उद्ध्वस्त... काळाने हिरावली पती-पत्नीची साथ...

कार-दुचाकीच्या भीषण धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी अंत; वांजरीचे माजी सरपंच बंडू सिडाम व पत्नी सविता यांचा मृत्यू

वणी :- सुरज चाटे 

     करंजी-वणी महामार्गावरील जळका फाट्याजवळ बुधवारी दुपारी काळाने घातलेल्या घावाने एका हसत्या-खेळत्या संसाराचा अंत झाला. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वांजरीचे माजी सरपंच बंडू सिडाम (५३) आणि त्यांच्या पत्नी सविता सिडाम (४९) यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण वांजरी गावावर शोककळा पसरली असून सिडाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
     मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास बंडू सिडाम हे पत्नी सविता यांच्यासह दुचाकीने वाई गुरुद्वारा मार्गे आपल्या वांजरी गावाकडे जात होते. दरम्यान, जळका फाट्याजवळ वळण घेत असताना वणीहून करंजीच्या दिशेने जाणाऱ्या किया सेल्टोस कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.
     या भीषण अपघातात सविता सिडाम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेले बंडू सिडाम यांना तातडीने उपचारासाठी मारेगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात येत होते. दुर्दैवाने नागपूरला पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचीही प्राणज्योत मालवली. त्यामुळे एकाच अपघातात पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

एका क्षणात संसार उद्ध्वस्त
     सुख-दुःखात एकमेकांची साथ देणाऱ्या पती-पत्नीची अपघातात झालेली ही दुर्दैवी ताटातूट मन हेलावून टाकणारी आहे. ज्या हातात हात घालून ते आपल्या गावाकडे परतत होते, त्याच प्रवासाने त्यांच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास ठरावा, ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. माजी सरपंच बंडू सिडाम आणि त्यांच्या पत्नी सविता यांच्या निधनाने सिडाम कुटुंबाचा आधार हरपला असून वांजरी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



Post a Comment

0 Comments