ADvt

खाण सुरक्षा व कामगार कल्याणासाठी आरसीसीपीएलचा पुढाकार



खाण सुरक्षा व कामगार कल्याणासाठी आरसीसीपीएलचा पुढाकार

मुकुटबन व पेरसोडा खाणींच्या प्रथम त्रिपक्षीय सुरक्षा समिती बैठकीत ‘झिरो अपघात’ उद्दिष्टावर भर

वणी :- सुरज चाटे 

     आरसीसीपीएल प्रायव्हेट लिमिटेड (एम.पी. बिर्ला समूह) अंतर्गत कार्यरत मुकुटबन लाइमस्टोन अँड डोलोमाइट माइन्स तसेच पेरसोडा लाइमस्टोन माइन्स यांच्या प्रथम त्रिपक्षीय सुरक्षा समितीची बैठक नागपुरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. खाण क्षेत्रातील कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
     बैठकीला खान सुरक्षा महासंचालनालयाचे (DGMS) पश्चिम विभागाचे उपमहानिदेशक रामअवतार मीणा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच आरसीसीपीएलचे चीफ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोजेक्ट्स रजत कुमार प्रस्टी यांची विशेष उपस्थिती लाभली.
     यावेळी डीजीएमएसचे वरिष्ठ अधिकारी, आरसीसीपीएलचे पदाधिकारी, सुरक्षा विभागाचे प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी तसेच यंत्रचालकांनी सहभाग नोंदविला. व्यवस्थापन, सुरक्षा अधिकारी आणि कामगार यांच्यातील संवादामुळे बैठक अत्यंत उपयुक्त व परिणामकारक ठरली.
     मुख्य पाहुणे रामअवतार मीणा यांनी खाण उद्योगात सुरक्षा संस्कृती अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित केली. ‘ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स (सेंट्रल) रुल्स-२०२६’ मधील विविध तरतुदींचा उल्लेख करत त्यांनी कामगारांची सुरक्षा ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून नैतिक व मानवी कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले.
     कार्यस्थळी सुरक्षित कार्यपद्धती, संभाव्य धोक्यांची पूर्वओळख, सातत्यपूर्ण प्रशिक्षण, सुरक्षा उपकरणांचा अनिवार्य वापर आणि कामगारांसाठी आरोग्यविषयक सुविधा प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. तसेच खाण क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवून त्यांच्यासाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि सर्वसमावेशक कार्यपरिसर निर्माण करण्यावरही त्यांनी भर दिला.
     आरसीसीपीएलच्या वतीने बोलताना रजत कुमार प्रस्टी यांनी कर्मचारी व कामगारांच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी कंपनी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. खाणींमध्ये सुरक्षित कामकाजाचे वातावरण, सुरक्षा मानकांचे कठोर पालन आणि कामगार हितसंवर्धनासाठी आवश्यक सर्व उपाय प्रभावीपणे राबविले जातील, असे त्यांनी सांगितले.
      बैठकीत सहभागी मान्यवरांनी ‘झिरो अपघात’ उद्दिष्ट, सुरक्षित कार्यसंस्कृती, संवादाधारित व्यवस्थापन, कामगार सहभाग आणि कल्याणकारी उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला. या बैठकीमुळे डीजीएमएस, व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधी यांच्यात सकारात्मक संवाद निर्माण होऊन खाण सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण दिशा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
     खाण क्षेत्रातील सुरक्षा, आरोग्य आणि कामगार कल्याणाबाबत आरसीसीपीएलची बांधिलकी अधोरेखित करणारी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

Post a Comment

0 Comments