गर्वाचे घर खाली....
राजकारणात सत्ता मोठी की जनसंपर्क? पैसा मोठा की जिद्द? सत्तेचा दबदबा मोठा की कार्यकर्त्यांच्या घामातून उभा राहिलेला विश्वास? कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीने या सर्व प्रश्नांची उत्तरं पुन्हा एकदा दिली.
एका बाजूला राज्यातील महायुतीचे वजनदार नेते, मंत्री, खासदार, आमदार आणि प्रस्थापित राजकीय घराणी तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील आणि त्यांची कमालीची जिद्द. गोकुळची निवडणूक ही केवळ दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक नव्हती तर ती सत्तेच्या सामर्थ्याची व अहंकाराची परीक्षा होती. या संघर्षात सर्वात मोठा धक्का बसला तो महायुतीच्या '२५-०' च्या विजयाच्या गर्विष्ठ दाव्याला.
महायुतीचे एक मंत्रीमहोदय मोठ्या दिमाखाने सांगत सुटले होते की महायुतीचा विजय '२५-०' असा होईल. तसे हे महाशय वल्गनाविरच आहेत. २०१९ साली स्थापन झालेल्या युती सरकारमध्ये हे महाशय मंत्री असताना म्हणाले होते की, आम्ही रस्ते बांधकामात असे तंत्रज्ञान आणणार आहोत की रस्त्यांवर आता खड्डेच पडणार नाही. पण प्रत्यक्ष परिस्थिती काय तर यांच्या रस्त्यांना रस्ते म्हणावे की खड्यातील रस्ते म्हणावे काही कळेना राव. हे महाशय स्वतःच्या भागात निवडून येऊ शकत नाही म्हणून कोथरूड मधून उभे राहतात. व यांना उमेदवारीही कशी मिळते तर तिथल्या कर्तुत्ववान महिला आमदाराचा पत्ता कट करून. नेहमी काहीतरी बोलून सरकारची पंचाईत करून ठेवणारे, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळेस तुम्ही फक्त इंदूर लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरा आणि इतर मतदारसंघात प्रचाराला जा. तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची असा पक्का विश्वास मध्यप्रदेशच्या तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिला असतानाही मी माझ्या नागपूरमधूनच लढणार असे स्पष्ट सांगून नागपूरमधूनच निवडणूक लढविणारे व दोनदा निवडून येणारे गडकरी कुठे आणि हे महाशय कुठे.
खरं म्हणजे भाजपाने यांची जागा एखाद्या कोपऱ्यात करून ठेवलेली बरी .
"फिनिक्स पक्षासारखे राखेतून उभे राहणे"
राजकीय अपयशांचे अनेक धक्के सहन करून दूध संघाच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटलांचे यश निश्चितच अभिनंदनीय म्हणावे लागेल. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील प्रतिकूल अनुभव, त्यांच्या समर्थकांचे पराभव आणि जिल्ह्यात बदललेली राजकीय समीकरणे यामुळे यांच्या नेतृत्वावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. त्यात वडिलांच्या निधनाचा आघातही त्यांच्यावर झाला होता. अशा परिस्थितीत बंटी पाटलांनी कसलेल्या पहिलवानाप्रमाणे गोकुळच्या आखाड्यात पूर्ण ताकदीनीशी उतरण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या या लढ्याचे महत्त्व निकालापुरते मर्यादित नाही. कारण राजकारणात पराभव होणे ही कमजोरी नसते, पराभवानंतर पुन्हा उभे राहण्याची हिम्मत नसणे ही कमजोरी असते.
कोल्हापूर तसे कुस्तीसाठी प्रसिद्ध. आमची ज्येष्ठ भगिनी कोल्हापूरला राहत असताना तिथे बरेचदा जाणे होत असे. तिथे चौकामध्ये म्हशी बांधलेल्या असायच्या. व आपण त्यांच्याकडे गेल्यावर म्हशी पाळणारी व्यक्ती विचारीत असत की "काय राव कोणत्या म्हशीचे दूध हवे आहे तुम्हाला या म्हशीचे की दुसऱ्या." आपण मग त्यांना आपल्याला हव्या त्या म्हशीच्या दुधाची ऑर्डर द्यायची. आपल्यासमोर दूध काढून देत असत. आमचे भाऊजी दुधाचे शौकीन, येथील मुक्कामात अशा ठिकाणी ते आम्हाला घेऊन जात असत या ठिकाणाला तीकडे कट्टा असे म्हणतात व तेथील दुधाला कट्ट्यावरचे दूध असे म्हणतात. या कट्ट्यावरच्या दुधाचा आस्वाद मी घेतलेला आहे. या कट्ट्यांवर बरेच कुस्तीगीर कसरत करून दूध प्यायला यायचे. कुठलीही भेसळ न केलेले दूध पिणे हा पहीलवानांचा रोजचा शिरस्ता मी जवळून पाहीलेला आहे. असे पौष्टिक दूध पिलेला हा सतेज पहेलवान महायुती सारख्या बलाढ्य पहेलवानाला परास्त करून गेला.
"सत्तेचे बळ विरुद्ध जमिनीवरचा जनसंपर्क"....
महायुतीकडे सत्तेची ताकद होती, नेत्यांची मोठी फळी होती आणि साधनांची कमतरता नव्हती याच्या उलट बंटी पाटील यांच्याकडे यापैकी काहीच नव्हते. तरिही ते लढले कारण राजकारणात विशेषतः निवडणुकीत मोठी नावे पुरेशी नसतात. मतदारसंघात असलेला थेट संपर्क, त्यांच्या प्रश्नांची जाणीव आणि मतदानाच्या दिवसापर्यंत टिकवून ठेवलेला विश्वास यांची कसोटी लागते. सतेज पाटलांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीवर भर दिला, गावोगावी संपर्क करून नाराजांची मनधरणी केली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या पॅनेलमध्ये सामान्य उमेदवारांना घेऊन आपली पूर्ण शक्ती त्यांच्या पाठीशी उभी केली व जबरदस्त विश्वासही दिला. त्यांनी निवडणूक ही केवळ नेत्यांच्या प्रतिष्ठेची न ठेवता स्थानिक कार्यकर्ते व दूध उत्पादकांच्या हिताशी जोडण्याचा प्रयत्न केला. यातून एक धडा मिळतो - सत्ता तुमच्याकडे असू शकते, पण प्रत्येक मतदारावर तुमचा हक्क असतोच असे नाही.
"गोकुळ म्हणजेच कोल्हापूरची अस्मिता!"
या निवडणुकीत सतेज पाटलांनी गोकुळच्या स्वयतत्तेचा, दूध उत्पादकांच्या हिताचा आणि कोल्हापूरच्या अस्मितेचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. अमूलसारख्या मोठ्या सहकारी दुग्ध व्यवसाय करणाऱ्या संस्थानंच्या विस्तारांच्या पार्शवभूमीवर स्थानिक दूध संघाचे अस्तित्व टिकवण्याचा प्रश्न त्यांनी मतदारांसमोर ठेवला. गोकुळचा कारभार कोणाच्या हातात असावा, त्याचे निर्णय कोणाच्या हितासाठी व्हावेत आणि उत्पादकांना त्यांच्या दुधाचा योग्य मोबदला मिळावा हा प्रश्न निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणण्यात त्यांना यश आले.
अस्मितेची हाक मतदारांना आकर्षित करते पण त्या हाकेला आर्थिक हिताची जोड मिळाली तरच मतदानात प्रभावी ठरते. हे सतेज पाटलांच्या रणनीतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले.
'अहंकाराला मतदारांचे उत्तर'
संपूर्ण निवडणुकीमध्ये महायुतीत प्रचंड अहंकार दिसून येत होता. प्रचंड आत्मविश्वास, विरोधकांना संधीच मिळणार नाही असा प्रचार यामुळे ही निवडणूक प्रतिष्टेची ची बनली. मतदारांना गृहीत धरण्याची चूक, मोठ्या नेत्यांची फौज असली तरी राजकीय दृष्ट्या महाग पडू शकते. स्थानिक नाराजी, अंतर्गत मतभेद आणि मतदारांचा बदलता कल याकडे महायुतीचे प्रचंड दुर्लक्ष झाले. यातून एक संदेश जातो: निवडणूक जिंकण्यापूर्वी विजयाचा जल्लोष सुरू करणे म्हणजे राजकीय आत्मविश्वास नव्हे, कधीकधी तो पराभवाची सुरुवात असतो. तरी यांना अबकी बार चारसो पार चा धडा मिळालेला असतानाही हे खुळे २५-० करीत बसले आणि तोंडावर आपटले.
या निकालाकडे पाहताना हा विजय बंटी पाटलांच्या राजकीय पुनरागमनाचा म्हणूनच पाहता येईल कारण एका सहकारी संस्थेचे निवडणुकीचे यश म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील किंवा राजकीय समीकरण बदलल्याचा अंतिम पुरावा नव्हे. महायुतीकडे अजूनही संघटनात्मक ताकद, सत्तेची साधने आहेत व प्रभावी नेतृत्वही आहे.
या पराभावातून धडा घेऊन संघटनात्मक सुधारणा करणे, स्थानिक कार्यकर्त्यांना महत्व देणे, वल्गनाविरांचा बंदोबस्त करणे अधिक महत्त्वाचे ठरेल.
या निवडणुकीतून एक गोष्ट स्पष्ट होते राजकारणात कोणीही अजिंक्य नसतो. कालचा पराभूत नेता उद्याचा विजेता होऊ शकतो. तसेच सत्तेच्या शिखरावर असलेल्यांना मतदार जमिनीवर आणू शकतात.
सतेज पाटलांनी या संघर्षात जिद्द, सातत्य, स्थानिक संपर्क आणि राजकीय मुद्द्यांची प्रभावी मांडणी यांचे महत्त्व दाखवून दिले. कारण राजकारणात सत्ता कायमची नसते विजयाचे गणितही कायमचे नसते. गर्वाचे घर खाली होते, जेव्हा सत्ताधारी जनतेला गृहीत धरतात आणि पराभवाची राख झटकून उभा राहणारा नेता पुन्हा मैदान मारतो, तेव्हा त्याची जीद्दच त्याची खरी ताकद ठरते.
शेवटी यातून एकच संदेश मिळतो.
"सत्ता तुमची असू शकते; पण विजयाचा निर्णय मतदारांचाच असतो."
दि. 23/10/26
विवेक देशपांडे
मो. 9422869503







0 Comments