ADvt

मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले...


मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले...

ज्येष्ठ पत्रकार प्रवीण शर्मा यांचे निधन; वणीच्या पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा...

‘मुक्त ललकार’चे संपादक म्हणून जनहिताच्या प्रश्नांना दिला निर्भीड आवाज....

वणी :- सुरज चाटे 

     वणी येथील ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक मुक्त ललकार चे संपादक प्रवीण दीवानचंद शर्मा (४८) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच वणी शहरासह पत्रकारिता, सामाजिक आणि विविध क्षेत्रांत शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
     प्राप्त माहितीनुसार, प्रवीण शर्मा हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शर्मा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवीण शर्मा यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. साप्ताहिक मुक्त ललकार च्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रश्न, जनहिताचे विषय, स्थानिक समस्या आणि प्रशासनातील बाबींवर सातत्याने निर्भीडपणे लेखणी चालवली. सामान्य नागरिकांच्या समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी प्रामाणिकपणे केले.
    निःपक्ष, धाडसी आणि समाजाशी बांधिलकी जपणारे पत्रकार म्हणून त्यांचा वणी परिसरात मोठा लौकिक होता. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने वणीच्या पत्रकारिता क्षेत्रातील एक संवेदनशील आणि निर्भीड आवाज हरपला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
     प्रवीण शर्मा यांच्या पार्थिवावर दि. २७ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने वणीसह परिसरात शोकमय वातावरण असून सर्वत्र श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments