ADvt

दोन दिवसांच्या कन्येचे देहदान; दुःखावर मात करत पालकांचा समाजसेवेचा आदर्श..



दोन दिवसांच्या कन्येचे देहदान; दुःखावर मात करत पालकांचा समाजसेवेचा आदर्श

जगद्गुरु नरेंद्राचार्यजींच्या देहदान चळवळीला पावडे दाम्पत्याचा मानवतेचा हातभार; यवतमाळ जिल्ह्यातील दुसरे देहदान संपन्न

वणी : - सुरज चाटे

   जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज, दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या दिव्य प्रेरणेतून समाजोपयोगी देहदान चळवळीला यवतमाळ जिल्ह्यातून आणखी एक महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. वणी तालुक्यातील सुकणेगाव येथील श्री. फेंगुल मारोती पावडे व सौ. शिंतल फेंगुल पावडे या दाम्पत्याच्या दोन जुळ्या कन्यारत्नांपैकी एका कन्येचा जन्मानंतर अवघ्या दोन दिवसांत मृत्यू झाला. या अत्यंत दुःखद प्रसंगातही पालकांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या चिमुकल्या कन्येचे देहदान करण्याचा निर्णय घेतला.


     कन्येचे देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानवी शरीराची रचना व कार्य समजून घेण्यासाठी देहदानातून मोठी मदत होते. भविष्यात प्रशिक्षित व तज्ज्ञ डॉक्टर घडविण्यासाठी अशा देहदानाचे महत्त्व अधोरेखित होते.
     जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती यवतमाळ पूर्व जिल्हाध्यक्ष विनायक सवाई यांनी दिली. या चळवळीअंतर्गत आतापर्यंत 248 देहदान झाले असून विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना देह उपलब्ध करून देण्यात आले आहेत.


     तसेच आतापर्यंत 215 अवयवदान, राष्ट्रीय महामार्गावर 53 रुग्णवाहिकांच्या माध्यमातून 34,859 दुर्घटनाग्रस्तांना मदत, तर ‘ब्लड इन नीड’ सेवेमार्फत 28,261 गरजू व्यक्तींना रक्तदान करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
     पर्यावरण संरक्षण, वसुंधरा पायी दिंडी, वेदपाठशाळा, मुला-मुलींसाठी मोफत शैक्षणिक उपक्रम तसेच विविध सामाजिक व पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून संस्थेचे कार्य सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
     या देहदानावेळी कन्येचे आई-वडील श्री. फेंगुल मारोती पावडे व सौ. शिंतल फेंगुल पावडे, आजी-आजोबा मारोती महादेव पावडे व ज्योती मारोती पावडे तसेच यवतमाळ पूर्व जिल्हा सहअध्यक्ष शंकर देवराव घोगरे, जिल्हा सचिव दीपक मारोती मोरे, सहकर्नल संजय भगत भिसे, ब्लॅक कमांडो राजू गांडूजी घोगरे, आकाश संतोष शिंदे, पंजाब राजाराम धुमाळ, वणी तालुका अध्यक्ष नागेश महादेव आत्मांगल, माजी झरी-जामणी तालुकाध्यक्ष शंकर दसरू भिमनकर व गोकुळ नगर सेवा केंद्र अध्यक्ष बापूराव गांडूजी घोगरे उपस्थित होते.


     दुःखाचा प्रसंग असतानाही समाजाच्या भविष्यातील वैद्यकीय शिक्षणासाठी आपल्या कन्येचा देहदान करण्याचा पावडे कुटुंबीयांचा निर्णय हा समाजासमोर मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.

Post a Comment

0 Comments