वणीत गर्दीचा महापूर; मात्र बाजारपेठेत ग्राहकांचा दुष्काळ. .
रस्त्यांवर वाहनांची रेलचेल, बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ; तरीही अपेक्षित खरेदीला प्रतिसाद नाही...
दिवाळीच्या तोंडावर व्यापारी वर्ग चिंतेत....
वणी :- सुरज चाटे
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, वणी शहरात सध्या सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा आणि विविध व्यावसायिक परिसर नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. वाहनांची वाढलेली वर्दळ, खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक आणि ठिकठिकाणी दिसणारी गर्दी यामुळे संपूर्ण शहरात दिवाळीची लगबग सुरू झाल्याचे चित्र आहे.
मात्र या गर्दीमागील एक वेगळेच वास्तव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शहरात नागरिकांची एवढी मोठी रेलचेल असतानाही व्यापारी वर्गाला अपेक्षित असलेला ग्राहकांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. बाजारपेठेत गर्दी दिसते, दुकानांसमोरून नागरिकांची ये-जा सुरू असते; मात्र प्रत्यक्ष खरेदीच्या बाबतीत अपेक्षित उलाढाल होत नसल्याची भावना छोटे-मोठे व्यापारी व्यक्त करीत आहेत.
दिवाळी हा व्यापारी वर्गासाठी वर्षातील सर्वाधिक महत्त्वाचा हंगाम मानला जातो. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, किराणा, मिठाई, सजावटीच्या वस्तू, फटाके, भांडी तसेच विविध जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीतून या काळात मोठी आर्थिक उलाढाल होण्याची अपेक्षा असते. त्यानुसार व्यापाऱ्यांनी दुकानांमध्ये आकर्षक सजावट, विविध वस्तूंचा साठा आणि ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्सची तयारी केली आहे. मात्र गर्दीच्या तुलनेत खरेदी कमी असल्याने व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाऐवजी चिंतेचे सावट दिसत आहे.
मग ही गर्दी नेमकी कशाची?
हा प्रश्न सध्या वणीच्या व्यापारी वर्तुळात चर्चिला जात आहे. नागरिक केवळ फिरण्यासाठी, विविध कामांसाठी, नातेवाईकांच्या भेटीसाठी किंवा इतर कारणांसाठी शहरात येत आहेत का? दुष्काळ, वाढती महागाई, मर्यादित आर्थिक उत्पन्न, ऑनलाइन खरेदीचा वाढता प्रभाव की ग्राहकांकडून खरेदीचा मुहूर्त साधण्याची प्रतीक्षा, यापैकी नेमके कारण काय, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
एकीकडे दिवाळीच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले असताना दुसरीकडे व्यापाऱ्यांच्या नजरा मात्र ग्राहकांच्या खरेदीकडे लागल्या आहेत. येत्या काही दिवसांत खरेदीला वेग येईल आणि बाजारपेठेत अपेक्षित आर्थिक उलाढाल होईल, अशी आशा व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
शहरात गर्दीचा महापूर असताना बाजारपेठेत खरेदीचा ओघ मात्र मंदावलेला दिसत असेल, तर ही बाब निश्चितच विचार करायला लावणारी आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी वणीच्या व्यापाऱ्यांसाठी कितपत आर्थिक भरभराट घेऊन येते, हे येणारा काळच ठरवेल!







0 Comments