खादीच्या आड ‘सेटिंग’चे राजकारण?; उद्योगांना टार्गेट करून आंदोलनांचा बाजार...
शेतकरी, कामगारांना पुढे करून आंदोलन; कंपनीशी पडद्याआड तडजोडीच्या चर्चांना उधाण — रोजगार देणाऱ्या उद्योगांचे हित धोक्यात...
वणी : - सुरज चाटे
वणीसह तालुक्यात सध्या पांढरे खादीचे कपडे परिधान करून राजकीय पदे मिरविणाऱ्या काही स्वयंघोषित पदाधिकारी व नेत्यांची संख्या वाढताना दिसत आहे. लोकप्रतिनिधी अथवा पक्षाचे पदाधिकारी म्हणून परिसरातील उद्योग, कंपन्या आणि विविध प्रकल्पांविरोधात आंदोलन उभारण्याचा एक नवा प्रकार काही ठिकाणी चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, आंदोलनाच्या नावाखाली शेतकरी, कामगार, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना पुढे करून दबाव निर्माण करायचा आणि त्यानंतर संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाशी पडद्याआड तडजोड करून स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधायचा, अशा आरोपांची चर्चा परिसरात सुरू आहे.
एखाद्या कंपनी विरोधात स्थानिक नागरिकांची समस्या, कामगारांचे प्रश्न अथवा शेतकऱ्यांच्या मागण्या असतील तर त्यासाठी लोकशाही मार्गाने आवाज उठविणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र आंदोलनातील सहभागींच्या मागण्या आणि अंतिम तोडगा यामध्ये पारदर्शकता नसल्यास प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. आंदोलन करणाऱ्यांनी कंपनीशी नेमकी कोणती चर्चा केली, कोणत्या मागण्या मान्य झाल्या आणि त्याचा लाभ संबंधित शेतकरी-कामगारांना प्रत्यक्ष मिळाला का, याची माहिती सार्वजनिक होणे गरजेचे आहे.
‘महिना’च्या चर्चेने खळबळ..
परिसरातील काही उद्योगांना विशिष्ट रक्कम अथवा ‘महिना’ देण्यासंदर्भात दबाव टाकला जात असल्याच्या चर्चाही ऐकायला मिळत आहेत. मागणी मान्य न झाल्यास कंपनी विरोधात आंदोलन करण्याची, कंपनीचे कथित कमकुवत मुद्दे उचलून धरत कंपनी बंद पाडण्याची धमकी दिली जात असल्याचे आरोपही काही ठिकाणी होत आहेत. या आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक असले, तरी अशा प्रकारच्या चर्चांमुळे उद्योगविश्वात आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंता निर्माण होत आहे.
उद्योग बंद पडला तर चूल कुणाची विझणार?.
वणी परिसरातील अनेक उद्योगांमध्ये स्थानिक शेतकरी कुटुंबातील युवक, कामगार, कंत्राटी कर्मचारी, वाहनचालक, छोटे व्यावसायिक तसेच विविध सेवा देणारे नागरिक रोजगार आणि व्यवसायाच्या माध्यमातून जोडलेले आहेत. एखाद्या उद्योगाविरोधातील आंदोलनाचा परिणाम केवळ कंपनीपुरता मर्यादित राहत नाही; त्याचा थेट परिणाम त्या उद्योगावर अवलंबून असलेल्या असंख्य कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर होऊ शकतो.
त्यामुळे कंपन्यांच्या चुकीच्या कारभाराविरोधात आवाज उठविणे आवश्यकच; मात्र त्या नावाखाली वैयक्तिक आर्थिक हितसंबंध साधले जात असतील तर तो गंभीर सामाजिक प्रश्न ठरू शकतो.
आंदोलन जनतेसाठी की वैयक्तिक स्वार्थासाठी?..
जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या आंदोलनामागील भूमिका स्पष्ट ठेवणे गरजेचे आहे. आंदोलनकर्त्यांनी कंपनीकडून कोणतीही तडजोड अथवा आर्थिक लाभ घेतला नसल्यास त्याची पारदर्शक माहिती देणे, तर कंपनीशी तडजोड झाली असल्यास ती कोणत्या अटींवर झाली हे संबंधित कामगार व नागरिकांसमोर मांडणे, हीच खरी जनतेशी बांधिलकी ठरेल.
पांढरा खादीचा शर्ट हा जनसेवेचे प्रतीक असू शकतो; मात्र त्या खादीमागील भूमिका जनहिताची आहे की वैयक्तिक हिताची, हे आता जनतेनेच तपासण्याची वेळ आली आहे.







0 Comments