ADvt

वणीतील मुख्य चौकांतच नेटवर्कचा बोजवारा....


वणीतील मुख्य चौकांतच नेटवर्कचा बोजवारा....

मोबाईलधारक त्रस्त :-  मोबाईलवरील संभाषणही स्पष्ट ऐकू येईना, संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी...

वणी :- सुरज चाटे 

     आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल हे केवळ संपर्काचे साधन राहिले नसून दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. बँकिंग व्यवहार, ऑनलाइन पेमेंट, व्यावसायिक कामकाज, शासकीय सेवा आणि महत्त्वाचे संदेश यांसाठी मोबाईल नेटवर्क अत्यंत आवश्यक झाले आहे. 
     मात्र, वणी शहरातील खाती चौक ते गाडगे बाबा चौक या परिसरात नेटवर्कच्या समस्येमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार समोर येत आहे. त्यामुळे मुख्य चौकात ही नेटवर्क ची समस्या निर्माण होत असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. 

मोबाईलवर बोलणेही झाले कठीण!..
     शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्येच मोबाईल नेटवर्कची समस्या जाणवत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी नेमके कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. फोन लावल्यानंतर आवाज स्पष्ट ऐकू न येणे, संभाषणा दरम्यान आवाज तुटणे, कॉल अचानक कट होणे तसेच इंटरनेटचा वेग मंदावणे अशा समस्यांमुळे मोबाईल धारकांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.

     विशेषतः व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक, बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी तसेच ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या नागरिकांना चांगल्या नेटवर्कची आवश्यकता असते. अशा वेळी नेटवर्कची समस्या निर्माण झाल्यास कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहराच्या मध्यवर्ती भागातच अशी परिस्थिती, मग इतर ठिकाणांचे काय?
     वणी शहरातील मुख्य चौक आणि वर्दळीच्या परिसरात मोबाईल नेटवर्क सुरळीत असणे अपेक्षित आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातच नागरिकांना संपर्कासाठी अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मोबाईल कंपन्या ग्राहकांकडून विविध सेवांसाठी शुल्क आकारत असताना प्रत्यक्षात मिळणाऱ्या सेवेचा दर्जाही समाधानकारक असणे आवश्यक आहे.

संबंधित विभागाने तातडीने लक्ष द्यावे....
     खाती चौक ते गाडगे बाबा चौक परिसरातील नेटवर्क समस्येची संबंधित मोबाईल सेवा कंपन्या आणि तांत्रिक विभागाने प्रत्यक्ष पाहणी करावी. नेटवर्कची क्षमता, टॉवरवरील तांत्रिक अडचणी, कॉलची गुणवत्ता आणि इंटरनेटचा वेग यांची तपासणी करून आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

     नागरिकांना वारंवार नेटवर्कच्या समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. वणी शहरातील मुख्य चौक परिसरातच संपर्क व्यवस्था विस्कळीत होत असेल, तर ही समस्या केवळ मोबाईलपुरती मर्यादित राहत नाही, ती नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाशीही जोडली जाते. त्यामुळे संबंधित विभाग या तक्रारीची दखल घेऊन नेटवर्क सेवा सुरळीत करणार का?, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नेटवर्क नाही, तर सिम कशाला?
     वणीकरांचा सवाल; नेटवर्कच्या सततच्या समस्यांना कंटाळून अनेक कंपन्यांचे सिम बंद करण्याच्या विचारात मोबाईलधारक

Post a Comment

0 Comments