कापसाच्या शेतात गांजाची लागवड; २९ झाडे जप्त...
स्थानिक गुन्हे शाखेची पाटण पोलिस ठाणे हद्दीत धडक कारवाई; २ लाख ३६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत...
वणी : - सुरज चाटे
कापसाच्या पिकाआड गांजाची अवैध लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ ऑक्टोबर रोजी पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पार्डी परिसरात छापा टाकून गांजाची २९ हिरवी झाडे जप्त केली. या कारवाईत ७ किलो ६४५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, मुद्देमालाची किंमत २ लाख ३६ हजार ७५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात विलास नागोराव टेकाम (३५, रा. पार्डी, ता. झरी जामणी, जि. यवतमाळ) याचे नाव समोर आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी उपविभागात गस्त घालत असताना शेतात गांजाची अवैध लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन छापा टाकण्याची परवानगी घेण्यात आली. त्यानंतर पंच, राजपत्रित अधिकारी आणि कृषी तज्ज्ञांच्या उपस्थितीत संबंधित शेताची पाहणी करण्यात आली.
यावेळी कापसाच्या पिकामध्ये चार ते पाच फूट उंचीची गांजाची २९ हिरवी झाडे आढळली. झाडे पाने, खोड, बिया आणि मुळांसह जप्त करण्यात आली. संबंधित व्यक्तीकडे लागवडीचा परवाना नसल्याचेही समोर आले.
पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ता पेंडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक मिलिंद सरकटे, पोलिस उपनिरीक्षक धनराज हाके यांच्यासह पोलिस कर्मचारी सुनील खंडागळे, सुधीर पिदुरकर, सुधीर पांडे, किशोर आडे, रजनीकांत मडावी, सलमान शेख, नरेश राऊत आणि सतीश फके यांनी कारवाईत सहभाग घेतला.
काही दिवस अगोदरच शिरपुर पोलिसांनी अवैध गांजा लागवड उघडकीस आणली आणखी एक अवैध गांजा लागवडीचा प्रकार उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणातील पुढील पोलिस तपासाकडे लक्ष लागले आहे.







0 Comments