ADvt

दाट वस्त्यांमध्ये फटाक्यांची दुकाने...सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर



दाट वस्त्यांमध्ये फटाक्यांची दुकाने; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर...

वणी नगरपरिषद प्रशासनाला तपासणीचे साकडे; परवाने, अग्निसुरक्षा व साठवणुकीची पडताळणी करीता नगर परिषद उपाध्यक्ष तथा गटनेते राकेश बुग्गेवार यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

वणी :- सुरज चाटे

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वणी शहरातील विविध निवासी वस्त्यांमध्ये फटाक्यांची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत असून, या विक्री व साठवणुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दाट लोकवस्तीच्या परिसरात फटाक्यांचा नियमबाह्य साठा किंवा विनापरवाना विक्री होत असल्यास संभाव्य दुर्घटनेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वणी शहरातील फटाके विक्रीच्या दुकानांची तातडीने तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वणी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष तथा गटनेते राकेश बुग्गेवार यांनी केली आहे.
     यासंदर्भात त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात निवासी वस्त्या, बाजारपेठा तसेच दाट लोकवस्तीच्या परिसरात सुरू असलेल्या फटाके विक्री केंद्रांची संबंधित अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
     फटाके हे ज्वलनशील व स्फोटक स्वरूपाचे असल्याने त्यांची साठवणूक आणि विक्री करताना आवश्यक परवानग्या, परवान्यातील अटी, अग्निसुरक्षा नियम आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. मात्र, काही ठिकाणी नियमांचे पालन होत आहे किंवा नाही, याची खातरजमा प्रशासनाने करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

परवान्यांसह अग्निसुरक्षेचीही होणार तपासणी?..
     संबंधित दुकानदारांकडे सक्षम प्राधिकरणाचे वैध परवाने आहेत किंवा नाहीत, परवान्यात नमूद केलेल्या जागेतच विक्री व साठवणूक केली जात आहे का, दुकानांमधील विद्युत जोडणी, अग्निशामक उपकरणे, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग तसेच अन्य सुरक्षा उपाययोजनांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    तसेच पोलीस विभाग, अग्निशमन विभाग, महसूल विभाग आणि स्फोटक पदार्थांच्या परवान्यांशी संबंधित सक्षम प्राधिकरण यांच्या संयुक्त समन्वयातून विशेष तपासणी मोहीम राबविण्याची सूचनाही निवेदनातून करण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाईची मागणी...
     विनापरवाना फटाके विक्री, अनधिकृत साठवणूक, परवान्यातील अटींचे उल्लंघन किंवा अन्य कायदेशीर बाबींचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. संभाव्य धोकादायक साठा आढळल्यास सक्षम प्राधिकरणामार्फत जप्ती, विक्रीवरील निर्बंध किंवा आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. केवळ तपासणी करून न थांबता संबंधित दुकानदारांकडून नियमांचे पालन होत आहे किंवा नाही, याची पुनर्तपासणी करावी. फटाक्यांची सुरक्षित हाताळणी, साठवणूक आणि विक्री याबाबत दुकानदारांमध्ये जनजागृतीही करावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने सतर्क व्हावे!...
     नागरिकांचे जीवित आणि मालमत्तेची सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर कोणत्याही दुकानदारावर अन्याय न करता सर्व संबंधितांची समान निकषांनुसार आणि कायदेशीर तरतुदींनुसार तपासणी करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरपरिषद उपाध्यक्ष तथा गटनेते राकेश बुग्गेवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments