ADvt

दुमजली घरात सुरू होता बनावट देशी दारूचा काळा कारनामा....



दुमजली घरात सुरू होता बनावट देशी दारूचा काळा कारनामा....

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड :- 3,600 निप व लाखोंचा मुद्देमाल जप्त, मुख्य आरोपी फरार...

वणी :- सुरज चाटे

     वणी शहरालगत लालगुडा परिसरात एका आलिशान दुमजली घरात बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची धक्कादायक घटना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत उघडकीस आली. या कारवाईत घरातून मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या देशी दारूच्या बाटल्या तसेच दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. अवैध व नकली दारूविरोधातील अलीकडील काळातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
     प्राप्त माहितीनुसार, उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी दुपारी लालगुडा गावातील स्मशानभूमीजवळील एका दुमजली घरावर धाड टाकण्यात आली. धाडीदरम्यान पथकाला घरातील लाकडी दिवाण व आलमारीतून रुपेश संत्रा ब्रँडचे नकली स्टिकर लावलेल्या 90 मिलीच्या तब्बल 3,600 निप (36 प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेल्या) देशी दारूच्या बाटल्या आढळल्या. जप्त दारूची अंदाजे किंमत 1 लाख 62 हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
     तसेच घराला लागून असलेल्या टिनाच्या शेडमधून रिकाम्या बाटल्या, झाकण, काचेच्या बाटल्या, प्लास्टिक ड्रम तसेच दोन बाईक व एक मोपेड असा एकूण 2 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
     कारवाईदरम्यान, घरातील लाकडी दिवाणात लपून बसलेल्या एका युवकाला अटक करण्यात आली. विचारपूस केली असता सदर नकली दारूचा कारखाना श्याम भरत मेश्राम यांचा असल्याचे निष्पन्न झाले. अटक करण्यात आलेल्या युवकाने आपले नाव सूरज लोडे (रा. वेळाबाई) असे सांगितले. दरम्यान, कारखान्याचा मालक श्याम मेश्राम हा कुटुंबासह फरार झाल्याची माहिती मिळाली आहे.
     ही कारवाई उत्पादन शुल्क निरीक्षक पांढरकवडा पी. एस. बोठारे, भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक डी. एस. त्रिपाठी, उपनिरीक्षक एस. एल. बोडेवार, एस. एम. बुटले तसेच भरारी पथक, यवतमाळ येथील उपनिरीक्षक डी. डी. वाळके व सहकाऱ्यांनी केली. वृत्त लिहेपर्यंत पथकाची कारवाई सुरू होती.

Post a Comment

0 Comments