लालगुडा बनावट दारू प्रकरण : कारवाई झाली, पण ‘नेटवर्क’ अजूनही पडद्याआड?...
पुरवठा साखळी, विक्री जाळे, रासायनिक कच्चा माल व आरोग्य धोक्याचा तपास सुरू; आणखी कारखान्यांचा शोध घेण्याची मागणी
वणी :- सुरज चाटे
शहरालगत लालगुडा परिसरातील आलिशान दुमजली घरात सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत दि. २५ रोजी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मोठ्या प्रमाणात तयार देशी दारू व निर्मितीसाठीचे साहित्य जप्त करण्यात आले. मात्र या कारवाईनंतरही अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत.
जप्त साठा नेमका कुठून आणला जात होता? अवैध दारूची विक्री कोणत्या भागात आणि कोणाकडे केली जात होती? या मागे स्थानिक की बाहेर जिल्ह्यातील मोठे जाळे कार्यरत आहे का? याचा शोध घेण्याचे काम तपास यंत्रणांनी हाती घेतले आहे. आरोपीच्या मोबाईल कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार आणि संपर्कातील व्यक्तींची चौकशी केली जात आहे.
कच्च्या मालाचा मागोवा...
दारू निर्मितीसाठी वापरली जाणारी रासायनिक पावडर, सुगंधी द्रव्ये, बनावट लेबले व पॅकेजिंग साहित्य कुठून मिळत होते, याबाबतही तपास सुरू आहे. या सर्व वस्तूंचा पुरवठा करणारी स्वतंत्र साखळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आरोग्यावर घातक परिणाम...
तज्ज्ञांच्या मते, बनावट दारूमध्ये घातक रसायनांचे मिश्रण असू शकते. अशा दारूचे सेवन केल्यास अंधत्व, यकृत निकामी होणे, मेंदूवर परिणाम किंवा मृत्यूचाही धोका संभवतो. त्यामुळे हे प्रकरण केवळ कायद्यापुरते मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही गंभीर आहे.
आणखी किती कारखाने?...
लालगुडा येथील कारवाईनंतर परिसरात आणखी अशा प्रकारचे गुप्त कारखाने सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे व्यापक तपास व सातत्यपूर्ण धाडसत्राची मागणी होत आहे.
दरम्यान, एका कारखान्यावर कारवाई झाली असली तरी संपूर्ण जाळे उध्वस्त करणे हीच खरी गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे. प्रशासनाने या प्रकरणाचा सर्वांगीण तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








0 Comments