ADvt

चंद्रपुरात लावणीचा गिनीज विक्रम....



चंद्रपुरात लावणीचा गिनीज विक्रम....

‘सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’चा जागतिक डंका...

     २,७०० विद्यार्थिनींचे ७ मिनिटे ३० सेकंदांत ७ लावण्यांचे सुसंगत सादरीकरण...

१८० देशांत विक्रमाची नोंद

वणी :- सुरज चाटे

     सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्स यांच्या पुढाकारातून आणि पी. एस. आंबटकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपुरात साकारलेल्या भव्य लावणी महोत्सवाने इतिहास रचला आहे. महाराष्ट्राची शान असलेल्या पारंपरिक लोककला लावणीचा जागतिक स्तरावर गिनीज विक्रम नोंदवत या उपक्रमाने राज्याचा मान उंचावला.


     रविवारी सायंकाळी ६ वाजता चंद्रपूर शहरात हा ऐतिहासिक क्षण साकारला. उत्कृष्ट महिला बहुउद्देशीय संस्थेच्या आयोजनातून विविध शाळा व संस्थांतील तब्बल २,७०० विद्यार्थिनी व महिलांनी एकाच वेळी ७ मिनिटे ३० सेकंदांत ७ लावण्यांचे सुसंगत सादरीकरण करत विश्वविक्रम प्रस्थापित केला.
     पारंपरिक नऊवारी साड्या, ठसकेबाज हालचाली आणि तालबद्ध ठेक्यांनी परिसर भारावून गेला. शिस्तबद्ध नियोजन, नेमकी वेळ आणि कलात्मक सादरीकरण यामुळे हा विक्रम अधिकच भव्य ठरला. सांस्कृतिक परंपरेला आधुनिक व्यासपीठ देत लावणीला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रयत्न यशस्वी झाला.


▪️ अभिमानाचा क्षण : १८० देशांत नोंद...
    या जागतिक विक्रमाची नोंद तब्बल १८० देशांत करण्यात आली असून, चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. लोककलेला जागतिक व्यासपीठ देण्याचा हा उपक्रम सांस्कृतिक चळवळीला नवी दिशा देणारा ठरला आहे.
     याप्रसंगी सोमय्या ग्रुपचे संचालक पी. एस. आंबटकर यांनी भविष्यातही अशाच उपक्रमांतून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा जगासमोर मांडण्याचा संकल्प व्यक्त केला.
     महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा जागतिक सन्मान करणारा हा विक्रम सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल, यात शंका नाही.

Post a Comment

0 Comments