तलवार-दांडपट्टा व लाठीकाठी प्रशिक्षक तेजस्विनी गव्हाणे चा पोलिस मुख्यालयात गौरव...
महिला दिनानिमित्त यवतमाळ येथे पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते सन्मान; साहसिक खेळांद्वारे मुला-मुलींना देत आहे प्रशिक्षण
वणी :- सुरज चाटे
वणी तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राजू देवरावजी गव्हाणे तसेच प्रभाग क्रमांक १४ ‘अ’ च्या नगरसेविका सौ. मनिषा राजू गव्हाणे यांची कन्या तेजस्विनी गव्हाणे हिचा यवतमाळ पोलिस मुख्यालयात सन्मान करण्यात आला. महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व युवतींचा गौरव करण्यात आला असून त्यामध्ये वणीतील तलवार-दांडपट्टा, भाला व लाठीकाठी या साहसिक खेळांची युवा प्रशिक्षक तेजस्विनी राजू गव्हाणे हिचा समावेश होता. तिचा सन्मान जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते करण्यात आला.
तेजस्विनीला लहानपणापासूनच साहसिक खेळांची विशेष आवड आहे. अवघ्या सातव्या वर्षी तिने तिचे आजोबा वस्ताद देवरावजी गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाठीकाठी तलवारबाजी चे प्रशिक्षण घेतले त्यानंतर नागपूर येथील सुप्रसिद्ध लाठीकाठी वस्ताद आप्पासाहेब भोसले यांच्या ताजराज हिरा आखाड्यात तिने पुढील प्रशिक्षण घेतले.
स्वतःचे कौशल्य विकसित करताना तेजस्विनीने स्वतःचा चमू तयार करून मुला-मुलींना लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, बाणा, भाला यांसारख्या पारंपरिक साहसिक खेळांचे प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू केले आहे. तिच्या प्रशिक्षणातून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी शारीरिकदृष्ट्या सक्षम होत असून मर्दानी खेळांची परंपरा जपली जात आहे.
याशिवाय तेजस्विनी कराटे या खेळात ब्लॅक बेल्टधारक असून वकृत्व, विविध कला आणि सामाजिक कार्यातही ती सक्रिय आहे. तिच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.









0 Comments