‘बाप्पा माझा स्पर्धा २०२६’मधून पर्यावरण संवर्धनाचा जागर
भाजप वणी शहराचा अभिनव उपक्रम; घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आकर्षक पारितोषिके....
वणी : सुरज चाटे
गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, स्वदेशी वस्तूंचा वापर आणि सामाजिक संदेशाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, वणी शहर यांच्या वतीने ‘बाप्पा माझा स्पर्धा २०२६’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार असून, विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेचे ‘अ’ व ‘ब’ असे दोन गट करण्यात आले आहेत. ‘अ’ गटात घरगुती गणपती, तर ‘ब’ गटात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही गटातील स्पर्धकांनी ‘स्वदेशी वस्तूंचा वापर’ किंवा ‘पर्यावरण संवर्धन’ या दोन विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर आकर्षक देखावा सादर करणे आवश्यक आहे.
दोन्ही गटांमध्ये... प्रथम क्रमांकासाठी ₹५,००० व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ₹३,००० व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी ₹२,००० व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
१६ सप्टेंबरपर्यंत नोंदणी....
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत आयोजकांनी दिलेल्या क्रमांकावर नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर आपल्या गणेशमूर्ती व देखाव्याचा फोटो व्हॉट्सॲपद्वारे पाठविणे आवश्यक आहे. त्यानंतर दि. १७ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजक व परीक्षक प्रत्यक्ष घरी अथवा संबंधित गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन देखाव्याचे परीक्षण करणार आहेत.
ही स्पर्धा वणी शहर व लगतच्या गावांपुरती मर्यादित राहणार आहे. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव या दोन्ही गटांतील प्रत्येकी २० निवडक नोंदणींचे परीक्षण करण्यात येणार आहे. नोंदणी करताना घराचा अथवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा संपूर्ण पत्ता आणि मोबाईल क्रमांक व्हॉट्सॲपद्वारे आयोजकांकडे देणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी शक्यतो सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत व्हॉट्सॲप अथवा फोनद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण, स्वदेशीचा स्वीकार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमात वणी शहरातील नागरिक, गणेशभक्त आणि गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार आणि ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी, शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी वणी यांनी केले आहे.
या स्पर्धेचे संयोजक श्री. मनोज सरमुकदम असून सहसंयोजक श्री. गणेश आसूटकर, श्री. बालाजी भेदोडकर, श्री. उमेश गंधारे, डॉ. सौ. नीलिमा दवणे, श्रीमती वैशाली वातिले, सौ. आरती गणेश वांढरे, सौ. संगीता मेश्राम, सौ. प्रिती बिडकर आणि सौ. पूजा रामगिरवार आहेत.
“बाप्पाच्या भक्तीसोबत पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशीचा संदेश घराघरात पोहोचवूया,” असा संदेश देत या स्पर्धेच्या माध्यमातून गणेशोत्सवाला सामाजिक व पर्यावरणपूरक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.







0 Comments