निष्ठावंतांना डावलून नवख्यांना संधी… पक्षांत नाराजीचे वारे....
पालिका निवडणुकीला रंग : वणीत राजकीय समीकरणात उलथापालथ...
वणी :- सुरज चाटे
वणी नगरपरिषद निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली असून विविध पक्षांत उमेदवारीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या पक्षांत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नवख्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वारे वाहू लागले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी निष्ठा राखून काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना उमेदवारीची आशा होती. परंतु स्थानिक पक्षश्रेष्ठी राजकीय समीकरण साधत नवख्या चेहऱ्यांना संधी देत असल्याने जुन्या कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळीत झाल्याचे बोलले जात आहे. नगरपरिषदेसाठी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार), मनसे, प्रहार, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आदी पक्ष रिंगणात उतरले आहेत. या पक्षांच्या संघटनांमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांची मजबूत फौज असूनही उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
सध्या निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून सत्ता काबीज करण्यासाठी विविध राजकीय खेळी खेळल्या जात आहेत. निष्ठावंतांमध्ये निर्माण झालेली नाराजी ही अनेक पक्षांसाठी चिंतेचा विषय ठरू शकते. या नाराजीचा थेट परिणाम आगामी निकालांवर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगत आहे. निवडणूक जवळ येत असताना ही नाराजी शमते का? की ती पक्षांच्या ताकदीला गालबोट ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षांतर्गत नाराजीने... ऐन वेळी पक्षप्रवेश?...
अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षात वर्षानुवर्षे कार्य करून सुद्धा संधी मिळत नसल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्याला बार्शिंग बांधण्याच्या तयारीत असल्याची खमंग चर्चा जोर धरत आहे.








0 Comments