वणीत श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन
४ ते ११ जानेवारीदरम्यान श्री जैताई मंदिरात होणार भक्तिरसपूर्ण कथासोहळा
वणी :- सुरज चाटे
शहरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण करणाऱ्या श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून हा धार्मिक सोहळा रविवार, ४ जानेवारी ते रविवार, ११ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. या सप्ताहात प्रख्यात भागवताचार्य पंडित मनुमहाराज तुगनायत (वणी) हे आपल्या संगीतमय शैलीत श्रीमद् भागवत कथेचे रसपूर्ण निरूपण करणार आहेत.
या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्री विनायक स्थापना व ग्रंथपूजनाने होणार असून दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत दररोज कथा प्रवाह सुरू राहणार आहे. कथेमध्ये श्रीमद् भागवत महात्म्य, अजामिल, भक्त प्रल्हाद, ध्रुव चरित्र, वामन अवतार, भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोवर्धन धारण, रुक्मिणी विवाह, सुदामा चरित्र आदी प्रसंगांचे सविस्तर व भावपूर्ण विवेचन करण्यात येणार आहे.
११ जानेवारी रोजी सकाळी ९ ते १२ होम-हवन, त्यानंतर दुपारी १२ ते ३ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह काळात दररोज सकाळी १० ते १२ विविध धार्मिक पूजाअर्चा पार पडणार आहेत. तसेच कथाप्रवाहानुसार मध्यप्रदेशातील कलाकारांच्या माध्यमातून धार्मिक झांकी सादर करण्यात येणार असून, झांकीपूर्वी गुरुकुल डान्स अकॅडमी (श्री चेतन जोशी सर) यांच्या विद्यार्थ्यांचे भक्तिगीतांवर आधारित नृत्य सादरीकरण होणार आहे.
हा संपूर्ण धार्मिक सोहळा श्री जैताई मंदिर, वणी येथे पार पडणार असून याचे आयोजन श्री भागवत सेवा समिती, वणी यांच्या वतीने करण्यात आले आहे. या भक्तिरसपूर्ण कथासोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











0 Comments