चिखलगाव ग्रामपंचायतीत भूकंप...
विकासकामां वरून असंतोष; 8 सदस्यांचे सामूहिक राजीनामे, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खळबळ...
वणी :- सुरज चाटे
चिखलगाव ग्रामपंचायतीत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा राजकीय भूकंप झाला असून, ग्रामपंचायतीतील आठ सदस्यांनी एकत्रितपणे राजीनामे सादर केल्याने वणी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायती तील विकास कामांची अंमल बजावणी, कार्यपद्धतीतील अपारदर्शकता व सदस्यांना डावलले जात असल्याच्या आरोपांमुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे राजीनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
राजीनामा देणाऱ्या सदस्यांमध्ये संतोष रामदास राजुरकर, अतुल नामदेवराव चांदेकर, पंकज दिगंबर मोरे, हरिश्चंद्र मुकिंदा कालेकर, सुधीर बबनराव ठेंगणे, अर्चना बलदेव वानखडे, सुचिता सुरेश भगत व माया हरिदास माटे यांचा समावेश आहे. या आठही सदस्यांनी दि. १ जानेवारी २०२६ रोजी आपले सामूहिक राजीनामे सादर करत ग्रामपंचायतीतील सध्याच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या सदर राजीनामे मंजूर झाले नसून सदस्यांच्या म्हणण्यानुसार, मासिक सभांमध्ये तोंडी स्वरूपात समस्या ऐकून घेतल्या जातात मात्र त्या लेखी प्रोसिडिंगमध्ये नमूद केल्या जात नाहीत, उलट कोऱ्या प्रोसिडिंगवर सही करण्यासाठी दबाव टाकला जातो. तसेच विकासात्मक कामांबाबत दिलेल्या सूचनांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते आणि “मी पाहून घेईल” अशा एकेरी भाषेचा वापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. गावातील बांधकामे नियम व अटींनुसार व्हावीत, अशी अपेक्षा असताना राजकीय हितासाठी नियमबाह्य मदत केली जाते, तसेच कोणतीही देयके अदा करताना ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अविकसित लेआऊटबाबत चर्चा केल्यास सरपंच रूपाली कातकडे व उपसरपंच हे जबाबदारी टाळणारी उत्तरे देतात, तर स्वतःच्या लेआऊटसाठी मात्र परस्पर ठराव घेऊन विकासकामे केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
गावातील अनेक विकासकामे ठप्प असून, सदस्यांच्या सूचनांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांच्या समस्या सोडवणे आणि पारदर्शक कारभार राखणे अशक्य झाले आहे, असा ठाम आरोप करत या आठही सदस्यांनी सामूहिक राजीनाम्याचा मार्ग स्वीकारला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे चिखलगाव ग्रामपंचायतच नव्हे तर वणी तालुक्याच्या राजकीय वर्तुळातही विविध चर्चांना उधाण आले आहे.
या संदर्भात मला माहिती नाही... किंवा कुठलीही चर्चा केली नाही.. रुपाली कातकडे (सरपंच)
अजूनपर्यंत राजीनामा देणाऱ्या सदस्यांनी माझ्याशी या विषयावर चर्चा केलेली नाही. त्यांनी राजीनाम्याची माहिती दिलेली नाही. मी सध्या बाहेरगावी असल्याने याबाबत फारशी माहिती नाही. मात्र गावात आल्यानंतर सर्व सदस्यांशी चर्चा करणार अशी माहिती सरपंच सौ. रुपाली सुनिल कातकडे यांनी दिली.








0 Comments