ADvt

वणी भाजपमध्ये खदखद......



वणी भाजपमध्ये खदखद......

निवडणूक जिंकूनही पक्षात अस्वस्थता, ‘मागील दाराने’ एन्ट्रीवरून वादळाची चिन्हे....

वणी :- सुरज चाटे 

     वणी नगरपरिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळवूनही भारतीय जनता पार्टीत सर्व काही ‘ऑल इज वेल’ नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसांतच पक्षांतर्गत असंतोष उफाळून येत असून, लवकरच पक्षात मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत दबक्या आवाजात मिळत आहेत.
     विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका माजी नेत्याला—जनाधार नसताना.... ज्याने कधीही थेट निवडणूक लढवलेली नाही तसेच दिलेल्या पदाची जबाबदारीही सिद्ध करता आलेली नाही—त्याला ‘मागील दाराने’ नगरपरिषदेत प्रवेश देण्याची तयारी सुरू आहे. या नेत्याला पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने शब्द दिल्याची चर्चा होताच, भाजपमधील सामान्य कार्यकर्ते, काही पदाधिकारी तसेच काही विद्यमान नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
     विशेष म्हणजे, निवडणुकी दरम्यान जीवाचे रान करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून अशा प्रकारे निर्णय होत असल्याचा आरोप होत असून, यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचा रोष वाढत आहे. “ज्यांनी पक्षासाठी रस्त्यावर घाम गाळला, त्यांनाच डावलले जात आहे,” अशी भावना अनेक कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे व्यक्त होत आहे.
     या घडामोडींमुळे भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून, काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या काही दिवसांत घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून, वणीच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 
नव्या दमाचे कार्यकर्ते..नव्या वर्षात हरपण्याचे संकेत..
       वणी पालिकेची निवडणूक अतिशय रंगतदार झाले असून मोठ्या प्रमाणात यात पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली व ती नावारुपात देखील आली आहे. मात्र काम झालं माझं काय करू तुझं... अस काहीस चित्र भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांत खमंग चर्चेत ऐकावयास मिळत असल्याने....नव्या दमाचे कार्यकर्ते.. भाजपा पासुन हरवणार तर नाही ना? अस चित्र अस्पष्ट असल तरी चर्चेचा विषय ठरत आहे. 

Post a Comment

0 Comments