वाणीकरांनो सावधान! तुम्ही पित असलेले कॅनचे पाणी खरोखरच आरओ शुद्ध आहे का?
एफडीएने सर्व पाणी प्लांटची स्वतंत्र तपासणी करून नमुने तपासावेत; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची चर्चा
वणी : - सुरज चाटे
वणी शहरासह परिसरात सध्या पिण्याच्या पाण्याच्या कॅनची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. छोट्या मालवाहू वाहनांमधून (छोटा हत्ती) दररोज हजारो लिटर पाणी विविध भागांमध्ये पोहोचविले जात असून प्रति कॅन सुमारे १५ रुपये दराने त्याची विक्री केली जात आहे. या फिरणाऱ्या विविध गाड्यांवर पिण्याचे "आरओ फिल्टर केलेले थंड पाणी" असा उल्लेख असला, तरी प्रत्यक्षात हे पाणी संबंधित प्लांटमध्ये आरओ प्रक्रियेतूनच शुद्ध व थंड केले जाते का, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरात कार्यरत असलेल्या अनेक पाणी प्लांटच्या गुणवत्तेबाबत विविध स्तरावर शंका व्यक्त केली जात आहे. काही नागरिकांच्या मते, एका प्लांटचा नमुना समाधानकारक आढळल्यानंतर त्याच प्लांटच्या पाण्याचा नमुना इतर ठिकाणच्या तपासणीसाठी वापरला जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. या चर्चेची सत्यता अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नसली, तरी त्यामुळे संपूर्ण तपासणी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
यामुळे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शहर व परिसरातील प्रत्येक पाणी शुद्धीकरण प्लांटमधून स्वतंत्रपणे पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पाण्याची शुद्धता, आरओ यंत्रणेची कार्यक्षमता, टीडीएस, सूक्ष्मजीवांची उपस्थिती तसेच इतर आवश्यक निकषांची नियमित तपासणी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पिण्याचे पाणी हा थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय असल्याने कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा गंभीर परिणाम घडवू शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने व्यापक तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्लांटवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.







0 Comments