यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; उद्या सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी...
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय...
वणी :- सुरज चाटे
जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाने ३१ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी करण्यात आला आहे.
सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून पूल व रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच हवामान विभागाकडून पुढील २४ तासांतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना ३१ जुलै २०२६ रोजी एक दिवसाची सुट्टी राहणार आहे. आवश्यक सेवा व यंत्रणांनी मात्र सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापना साठी सज्ज राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे, नदी-नाले व पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.








0 Comments