यवतमाळ जिल्हा महिला सल्लागार समितीवर पुष्पाताई आत्राम यांची नियुक्ती
18 Jul, 2022
वणी: राजु गव्हाणे
महिला व बालकल्याण यवतमाळ जिल्हा महिला सल्लागार समितीवर अशासकीय सदस्य म्हणून येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई आत्राम यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती तीन वर्षांकरिता असून यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सहिनिशी तसा आदेश प्राप्त झाला आहे.
गेल्या अनेक दशकांपासून पुष्पाताई आत्राम ह्या विविध सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय आहेत. त्या विविध संघटनांच्या महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्या कौटुंबिक सल्ला केंद्र चालवतात. कौटुंबिक प्रश्नांवर समुपदेशन करून तोडगा काढतात. महिलांवरील अत्याचार, हुंडा विरोध अशा प्रश्नांवर त्या आजही काम करीत आहेत. अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने झटत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार बहाल केला. तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मुंबई येथे नुकताच आदिवासी क्रांतीकन्या हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथात त्यांच्यावर एक सविस्तर प्रकरण लिहिण्यात आले. तसेच प्रकाशन सोहळ्यात त्यांचा आदिवासी क्रांती कन्या म्हणून सत्कार करण्यात आला. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 Comments