वणीचा फैसला उद्या...सत्तेची खुर्ची कुणाच्या हाती?
शहराची श्वास रोखणारी रात्र :- ५३% मतदानानंतर राजकीय भूकंपाची चाहूल..
लाखो-करोडोंच्या शर्यती, नगराध्यक्ष पदासाठी ‘डू ऑर डाय’ लढत?..
वणी :– सुरज चाटे
वणी नगरपरिषद निवडणूक २०२५ आता अंतिम क्षणात दाखल झाली आहे. उद्या, दि. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होताच वणीच्या राजकारणात भूकंप होणार की सत्तेची पुनरावृत्ती? याचा फैसला होणार आहे. मतदान झालंय… मतपेट्या सील झाल्यात… आणि आज संपूर्ण शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
प्रभाग क्र. १४–क मध्ये दि. २० डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात ५३ टक्के म्हणजेच ४९१५ पैकी २५९३ मतदारांनी मतदान केलं. सकाळी मतदारांचा प्रतिसाद थंडा, तर दिवसभरात राजकीय खेळींच्या चर्चा मात्र तापलेल्या होत्या.
३० जागांसाठी १५९ उमेदवार :- एका निकालाने बदलू शकते सत्ता समीकरण...
या निवडणुकीत १ नगराध्यक्ष व २९ नगरसेवक अशा एकूण ३० पदांसाठी मतदान झाले. नगराध्यक्ष पदासाठी ७ दिग्गज उमेदवार, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५२ उमेदवार रिंगणात उतरले होते. एका प्रभागाचा निकाल सुद्धा संपूर्ण पालिकेचा चेहरा बदलू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी थरारक - वणीची रात्र झोप हरवणारी..
नगराध्यक्ष पदासाठी दोन बलाढ्य उमेदवारांमध्ये काट्याची लढत असल्याची चर्चा शहराच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे. कोणाचा पॅनल फासेपार ठरणार? कुणाचं गणित शेवटच्या फेरीत कोसळणार? याच पार्श्वभूमीवर काही राजकीय वर्तुळात लाखो-करोडोंच्या शर्यती लागल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगली असून, त्यामुळे निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
१३ टेबलांवर मतमोजणी....
मतमोजणी दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता महसूल भवनात सुरू होणार आहे. १३ टेबल, ७० कर्मचारी, ६ फेऱ्या — आणि प्रत्येक फेरीसोबत राजकीय समीकरणं बदलत जाणार आहेत.
👉 पहिल्या चार फेऱ्यांत १२ प्रभागांचे निकाल,
👉 पाचव्या फेरीत दोन प्रभाग,
👉 आणि सहाव्या व अंतिम फेरीत प्रभाग १४–क
निकाल ध्वनिक्षेपकावरून जाहीर होणार असल्याने शासकीय मैदानावर जमलेले नागरिक प्रत्येक आकड्यावर श्वास रोखून ऐकणार आहेत.
कडेकोट पोलीस बंदोबस्त; शांततेत पण तणावात वणी..
मतदानापासून मतमोजणी पर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी स्वतः मैदानात उतरून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रशासन सज्ज असले तरी शहरात मात्र निकालपूर्व राजकीय धडधड स्पष्ट जाणवत आहे.
उद्या ठरणार इतिहास...
कोण होणार वणीचा नगराध्यक्ष? कोणाचा झेंडा फडकणार, कोणाचे मनसुबे डूबणार?, एक गुलाल उधळणार तर दुसरा कुठे कमी पडले याचे गणित जोडणार? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
🕙 उद्या सकाळी १० वाजल्यापासून वणीचे राजकारण थेट निकालाच्या तावडीत!..








0 Comments