बेलोरा चेक पोस्टजवळ मृतावस्थेत आढळला पट्टेदार वाघ...
वणी परिसरात एकच खळबळ...
वणी :- सुरज चाटे
वणी तालुक्यात वाघ दिसण्याच्या घटना नवीन नाहीत. घनदाट जंगल व कोळसा खदानांच्या परिसरामुळे अधूनमधून वाघांचा वावर नागरिकांच्या नजरेस पडत असतो. काही दिवसांपूर्वीही तालुक्यातील विविध भागात वाघ दिसल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र दि. २० रोजी सकाळच्या सुमारास बेलोरा खदान चेक पोस्ट जवळ पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळी चेक पोस्ट परिसरात कामगार व स्थानिक नागरिकांना रस्त्याच्या कडेला वाघ निष्प्राण अवस्थेत दिसताच तात्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली. काही वेळातच वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नसून विषबाधा, वाहनाची धडक की नैसर्गिक कारण?.. याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती. संभाव्य धोका लक्षात घेता वनविभागाने परिसर सील करून पंचनामा सुरू केला. मृत वाघाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी हलविण्यात येणार असून अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, वणी तालुक्यात मानवी वस्तीच्या जवळ वाघांचा वाढता वावर आणि आता थेट मृत वाघ सापडल्याची घटना ही वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.










0 Comments