राजूरच्या कचरा प्रश्नावर संताप; वेकोली प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम....
कारवाई न झाल्यास वेकोली कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा; फैजल बशीर खान यांच्या नेतृत्वात क्षेत्रीय महाप्रबंधकांना निवेदन....
सत्यभाषा वणी :- राजूर गावातील कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते फैजल बशीर खान व सय्यद मोसिम यांच्या नेतृत्वाखाली युवकांच्या शिष्टमंडळाने वेकोली राजूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली. गावातील साचलेला कचरा पुढील २४ तासांत उचलून स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, अन्यथा संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनानुसार, राजूर गावातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे मोठे ढीग साचले असून काही कचरा संकलन केंद्रांवरील कचरा तब्बल तीन महिन्यांपासून उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
कचरा संकलनाची जबाबदारी असलेली यंत्रणा व संबंधित ठेकेदारांकडून कामात गंभीर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याने वेकोली प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, २४ तासांच्या आत गावातील सर्व साचलेला कचरा उचलून प्रभावी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली नाही, तर वेकोली कार्यालयासमोर संविधानिक पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच गावातील साचलेल्या कचऱ्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतीकात्मक निषेध नोंदविण्यात येणार असून, आंदोलनाची वेळ आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी दानिश काझी, आमीन शेख, वेदांत हिकरे, प्रियांशू आत्राम आणि अजय आडकिलवार उपस्थित होते.








0 Comments