ADvt

भाजपाचा विकसित वणीचा वचननामा जाहीर…



भाजपाचा विकसित वणीचा वचननामा जाहीर…

भाजपाचा निर्धार – ‘विकसित वणी’चा भव्य व सर्वसमावेशक असा...

सत्यभाषा वणी :- नगर परिषद निवडणुकीची रंगत शिगेला पोहोचताना भारतीय जनता पक्षाने मंगळवारी आपला ‘विकसित वणी’चा भव्य व सर्वसमावेशक वचननामा जाहीर केला. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराज अहीर यांच्या हस्ते संकल्पपत्राचे लोकार्पण करण्यात आले. “विकसित भारत - विकसित महाराष्ट्र - विकसित वणी” या दृढ घोषवाक्याखाली भाजपने शहराच्या सर्वांगीण विकासाचे नवे दृष्टीचित्र मतदारांसमोर ठेवले आहे. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले की, मतदारांनी जेव्हा जेव्हा आम्हाला संधी दिली तेव्हा तेव्हा विकास त्यांच्या समोर ठेवला. त्यामुळे मतदारांनी संधी द्यावी आम्ही विकास घडवुन दाखवू असे यावेळी त्यांनी सांगितले. 


     भाजपच्या वचननाम्यात पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, शिक्षण, सांडपाणी व्यवस्थापन, दर्जेदार रस्ते, प्रकाशव्यवस्था, स्वच्छता आणि नागरिकांसाठी आधुनिक सुविधा उभारणी यांसह दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक मूलभूत अडचणींवर प्रभावी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. शहरातील रस्ते व नाल्यांचे दर्जेदार बांधकाम, पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प, स्मार्ट स्ट्रीटलाईटिंग, आधुनिक स्वच्छता प्रणाली आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संकल्प भाजपने व्यक्त केला आहे.


     युवक-युवतींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, अत्याधुनिक आरोग्यकेंद्र, सांस्कृतिक भवन, क्रीडा संकुल, कचरा प्रक्रिया प्रकल्प, तसेच शहरासाठी स्वतंत्र आणि प्रशस्त नाट्यगृह अशी विकासकामांची विस्तृत श्रृंखला या वचननाम्यात आहे. शहराच्या डिजिटल प्रगतीसाठी वणीमध्ये स्मार्ट सिटी मॉडेलप्रमाणे अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानसही संकल्पपत्रातून स्पष्ट झाला आहे.


   भाजपने आपल्या यापूर्वीच्या कार्यकाळातील विकासकामांची माहिती देत, नागरिकांनी दाखवलेल्या ठाम विश्वासामुळे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याचे नमूद केले. आगामी पाच वर्षांत वणीचा सर्वांगीण आणि नियोजित विकास हा केंद्रबिंदू ठेवून अखंड, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण कामकाज करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.
         
 भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उपस्थितीत संपूर्ण शहरभर संकल्पपत्राचे वितरण सुरू असून, वणीच्या भविष्यासाठी एक स्पष्ट, ठोस आणि विकासाभिमुख दृष्टीपत्र मतदारांसमोर ठेवले जात आहे.


  शेवटी, 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदांचे भाजप उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करून वणीच्या विकासाला वेग देण्याचे आवाहन पक्षाने नागरिकांना केले आहे.

Post a Comment

0 Comments